खडकी तीरावर बसलेले वसलेले शहर, गोदाकाठच्या प्रदेशाला गिरिजा, पूर्णा आदी नद्यांचा प्रदेश आज रात्री गोंद्याच्या शोधात रात्र पहारा करणार आहे. वाट पाहून पाहून थकलेले गोंद्याचे सवंगडी प्रेम आलाप आळवत आहेत. नयना तरसे, कधी येशील नंदलालाचे सूर उमटू लागलेत पण रुसलेला गोंद्या जाईल का? गोंद्या, चूक झाली असेल तर माफ कर बाबा, पण गोंद्या तू येऊन जा! अरे तुझ्या येण्याच्या किती आणाभाका घेतल्या म्हणून सांगू! तुझ्या विश्वासावरच हा खेळ मांडलाय, या खेळाचा इस्कोट करू नकोस. गोंद्या थकलेल्या तनाला, तरसलेल्या नयनांना, आतूरलेल्या मनाला आता तुझाच रे बाबा आसरा! अरे आपल्याच माणसांचा राग धरत सता व्हय ! आम्ही तुझ्यावर रागावणार नाही तुझ्या प्रेमावर शंका घेणार नाही, तुला दुखावणार नाही. पण गोंद्या तू येऊन जा ! विकासाच्या नावावर, जाती-धर्माच्या नावावर, नात्या गोत्याच्या नावावर आजपर्यंत तू दिलेल्या वचनाची याद ठेऊन ये, तुझ्या दमदाटीला, खोट्या आश्वासनाला, मोडलेल्या वचनाला, बेईमानीला, स्वार्थी वृत्तीला, बेबंदशाहीला, चेल्या- चपट्याच्या गुंडागर्दीला, भ्रष्टाचारी रोगाला विसरलो रे बाबा आम्ही.
त्यामुळे गोंद्या तू बिनधास्त येऊन जा ! रात्रीच्या काळोखात, चांदण्यांच्या मंद उजेडात, मध्यरात्रीच्या भयान शांततेत, पहाटेच्या गारगार झुळूकीत चोरपावलांनी ये! गाड्यांचा धुराळा, भोंग्याचे आवाज, भक्तांचा गलका मागे सोडून गोंद्या तू येऊन जा. खड्ड्यातल्या रस्त्यांची, पडक्या घरांची, सुनसान वाड्यांची, कोरड्याठाक पडलेल्या विहिरींची, भग्नावस्थेतील पाणी पुरवठा योजनेची, सताड उघड्या केटीवेअरची, जुनाट पत्रांच्या शाळांची, कचर्याच्या विळख्यात अडकलेल्या आरोग्य केंद्राची, डोळे मिटलेल्या पथदिव्यांची शपथ तुला गोंद्या तू येऊन जा ! खडखड करत धुळीच्या रस्त्यावरून धडधडत धावणार्या बसने, काळीपिवळीच्या टपावर बसून ये, नाहीतर उघड्या टेम्पोच्या दोरखंडाला लटकून ये पण गोंद्या आल्याशिवाय राहू नकोस! तुझ्या नावाने बोट मोडणारे, शिव्याशाप देणारे वेशीच्या पल्याड गेल्यावर, विरोधी कार्टी गाढ झोपेत असताना, हरी भजनाची वेळ संपल्यावर अन् सारा गाव साखरझोपेत असताना करकरणार्या तुझया बुटांना वेसण घालीत हळूच चोरपावलांनी ये. कुजबुजणार्या भक्तांच्या टोळीला दूर सारीत एकटाच येशील! एक सांग गोंद्या अरे, तू तर असा नव्हतास. नजरेच्या इशार्याला नकळत टिपणारा, आता नजरेला नजर भिडवत नाही. हाकेला ओ देणारा गोंद्या कानात हेडफोन लावल्यागत बहिरा झालाय. मेसेजचा क्षणार्धात रिप्लाय अन मिसकॉलला डायरेक्ट सप्लाय करणारा गोंद्या वारं भरल्यागत भिरभिरू लागलाय. त्याला फटका बसला की भुताखेतानं झपाटलं कळेना झालंय. पण गोंद्या चमत्कारिक वागू लागलाय. एक मागताच दहा देणारा गोंद्या आता पावभर पण द्यायला तयार नाही.संदेसा धाडला, जाऊन भेटलो, चकरावर चकरा मारल्या तरी गोंद्याचे दर्शन नाही. लोकांना कसेकसे समजावले आमच्या जीवाला ठाऊक. दिवस दिवस प्रचार कार्यालयात ठाण मांडले, बंगल्याला प्रदक्षिणा घातल्या. चारचौघांना घेऊन गेलो, एकटंही गेलो पण जमलं नाही. आता आस शेवटच्या रात्रीची. दिलेल्या वचनाला, घेतलेल्या शपथेला, ठेवलेल्या विश्वासाला जागायचं असेल तर गोंद्या तुला यावंच लागेल. अरे, ही खडकी नगरी, गोदातीराचा सुपीक प्रदेश, पूर्णा, खेळणा नदी परिसरातील वस्तीला तुझीच याद येतीये. आतापर्यंत आला रणरणत्या उन्हात. घामाच्या धारा पुसत येऊन कोरड्या घशाने भाषणे ठोकलीस. जय हो चे नारे लावणारे आजूबाजूला हिंडताना तुझ्याशी हितगुज करताच आले नाही. नक्की येतो म्हणून तू दिवसामागून दिवस ढकललेस. आता कडेलोट झालाय बाबा. तुझ्या येण्याची शपथ दिलीय सार्या गावाला. सारा इंतजाम करून ठेवलाय गोंद्या! वाट तुझीच पाहतोय... आजच्या रात्री, शपथ तुला तू येरे गोंद्या !